एका
गावात एक गाढव राहत होते. त्याचा मालक दुष्ट होता. त्याच्याकडून काम करुन घ्यायचा,
पण त्याला खायला पुरेसे देत नसे. गाढवाची उपासमार व्हायची. मग ते मालकाचा डोळा
चुकवून गावोभोवतीच्या शेतात जाऊन मिळेल ते खात असे. असेच एकदा शेतात गेल्यावर
त्याची एका लांडग्याशी मैत्री झाली. दोघांनी मिळून काकडच्या मळ्यात जाऊन जाऊन
भरपूर काकड्या खाल्ल्या. दोघांनाही काकड्या आवडल्या. हा क्रम काही दिवस चालू
राहिला. गाढवगुबगुबीत दिसू लागले होते. ते खुप आनंदात होते. रात्री लांडग्याबरोबर
काकड्या खाताना गाढव म्हणाले, मला आज गावेसे वाटते आहे. मी छान गाणं म्हणतो.
लांडगा घाबरला, तो म्हणाला, असं करु नकोस तू गाणं म्हटलस तर मळ्याचा मालक जागा
होईल आणि आपल्याला मारेल. पण गाढव ऐकायला तयार नव्हते. लांडग्याने त्याला तुझा
आवाज चांगला नाही, भलते धाडस करु नकोस, असे परोपरीने विनवले, पण गाढव काही ऐकायलाच
तयार नव्हते, शेवटी निरुपायाने लांडगा म्हणाला, तुला गायचे तर गा, पण मी पलिकडे
जाऊन थांबतो, मग गा. असे म्हणून लांडगा मळ्यातून बाहेर पडला.गाढवाने गायला म्हणजे
ओरडायला सुरुवात केली. व्हायचे तेच झाले. मळ्याचा मालक जागा झाला आणि त्याने
गाढवाला बदडून काढले.
तात्पर्य:-कोणतेही कृत्य करताना परिणामांचा विचार करावा.